sucess story : शेतीला दिली मशरूमच्या पूरक व्यवसायाची जोड छाया कुयटेंनी तयार केला "सुरज मशरूम" ब्रँड
बेताचीच आर्थिक परिस्थिती, उत्पन्नासाठी जेमतेम चार एकर शेती, निसर्गाचा लहरीपणा, यामुळे पिकांच्या उत्पादनासाठी झालेला खर्चही निघत नव्हता. तेव्हा शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याचा निश्चय बेलखेड ता तेल्हारा जि अकोला येथील विलास व छाया कुयटे या दांपत्याने केला. मशरूम (अळंबी) उत्पादनाची माहिती घेवून त्यांनी आठ वर्षांपूर्वी या व्यवसायाची मुहूर्तमेढ घरातच रोवली. या व्यवसायातून त्यांना महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळते. उच्च दर्जा, गुणवत्ता टिकवत त्यांनी स्वतःचा "सूरज मशरूम" नावाचा ब्रँड तयार केला आहे.
बेलखेड येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. विलास कुयटे यांचेही शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. ते कापूस ,गहू हरबरा यासारखी पिके घेतात. मात्र कधी निसर्गाचा मारा तर कधी उत्पादीत शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय परवडत नव्हता. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही हे कुयटे यांना समजून चुकले होते. शेतीला जोड धंदा असावा या शोधात असताना त्यांना एका मित्राकडून मशरूम उत्पादनाची माहिती मिळाली. मात्र उत्पादन कसे घ्यावे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे हे माहीत नसल्याने विलास कुयटे यांनी इंटरनेट व जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा आधार घेतला.
घरातच उत्पादनाची सुरूवात
कृषि विज्ञान केंद्रातून कुयटे दांपत्याने मशरूम उत्पादनाचे सोबत प्रशिक्षण घेतले. आठ वर्षांपूर्वी त्यांनी राहत्या घरात मशरूम उत्पादनाला सुरूवात केली. अत्यंत कमी खर्चात त्यांना पाहिले उत्पादन मिळाले. त्याची विक्री तेल्हारा तालुक्यात केली. पहिल्याच महिन्याला वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्यांनी हाच व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. ४० बेड पासून सुरू केलेला कुयटे यांचा हा व्यवसाय आज १००० बेडपर्यंत पोहचला आहे.
विहिरीत उत्पादनाचा प्रयत्न
घरातून सुरूवात केलेल्या मशरूमला तेल्हारा तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस मागणी वाढली आहे. त्यामुळे घराशेजारी टीन पत्र्याचे मोठे शेड उभारून त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरु केला. या जागेत सुमारे एक हजार बेडवर मशरूमचे उत्पादन घेतले जाते. ग्रामीण भागातील केवळ बारावी पर्यंत शिक्षण असलेल्या छाया कुयटे या उत्पादन तर त्यांचे पती विलास कुयटे हे विक्री व्यवस्थापन सांभाळतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मशरूम उत्पादनासाठी तापमान नियंत्रित ठेवावे लागते. टिन पत्र्याच्या शेडमध्ये उन्हाच्या तापमानामुळे अडचण येत आहे. त्यामुळे त्यांनी आता शेतीतील २७ फुटाच्या विहिरीमध्ये मशरूम उत्पादनाची तयारी सुरु केली आहे.
सुरज नावाचा ब्रँड केला तयार
सुरुवातीला तेल्हारा तालुक्यात मशरूमला फारशी मागणी नव्हती. त्यामुळे कमी उत्पादन घेतले. तालुक्यात याचा प्रचार व प्रसार केला तसेच नागरिकांना मशरूम चे महत्व पटवून दिल्याने मागणी वाढली. वाढता खप लक्षात घेऊन विलास कुयटे यांनी स्वतःचा सुरज मशरूम नावाचा ब्रँड तयार केला.
मशरूमला १ हजार रुपये भाव
मशरूम उत्पादनासाठी बेड तयार करण्यासाठी शेतातील गव्हाच्या काड्या तसेच सोयाबीनच्या काड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होते. १ किलो बियाणे (स्पॉन ) मध्ये १० बेड तयार होतात. व एका बेड पासून १ किलो उत्पादन मिळते. मशरूमला सध्या १ हजार रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. महिन्याकाठी किमान २० किलो मशरूम ची विक्री होते. कधी हि विक्री ४० किलोपर्यंत जाते.
उपपदार्थाची निर्मिती
विक्री न झालेले शिल्लक राहिलेले मशरुम खराब होऊन नुकसान टाळण्यासाठी छाया कुयटे त्यापासून मशरूम वाडी, मशरूम पापड, मशरूम लोणचे, मशरूम आटा (पीठ), मशरूम पावडर, ड्राय मशरूम असे उपपदार्थ तयार करून त्याची विक्री करीत आहेत. या व्यवसायात त्यांची दोन्ही मुले त्यांना मदत करतात.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या व्यवसायात झोकून देऊन गेल्या आठ वर्षांपासून काम करीत आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यवसायात वृद्धी झाली. भविष्यात मशरूमची सुरज ब्रँड नावाने देशात विक्री करीत बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न आहे. एकदा व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा नसला तरी पैसे उभारता येतो.
छ्या कुयटे, बेलखेड ता तेल्हारा जि अकोला